Ad will apear here
Next
एरोबिक फॉर्म (सूर्यनमस्कार लेखमाला - ११)
मागच्या रविवारी आपण सूर्यनमस्कारांचा  मेडिटेटिव्ह फॉर्म पाहिला. आज आपण एरोबिक फॉर्म पाहू. 

वास्तविक या दोन्ही फॉर्म मध्ये आपण सारखीच आसने करणार आहोत. फक्त त्यांचा वेग कमालीचा वेगळा असणार आहे. सूर्यनमस्कार मोजण्याची पद्धतदेखील वेगळी असणार आहे आणि या दोन्ही फॉर्ममधून मिळणारे फायदे संपूर्णपणे वेगळे असणार आहेत. 

मेडिटेटिव्ह फॉर्मचा मुख्य उद्देश शरीराला या व्यायाम प्रकाराची सवय करून देण्याचा आहे. गोडी लावून देण्याचा आहे. गेली कित्येक वर्षे न वाकल्याने आखडून गेलेली पाठ, कंबर, खांदे व्यवस्थित वापरात आणून, त्यांना चांगले तेल-पाणी देऊन चकचकीत करण्याचा उद्देश आहे. कुठलाही बदल हळूहळू स्वीकारायला हवा. त्याच्यात घाईगडबड केली, तर तो बदल आपले शरीर अंगीकारणार नाही. अचानक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आपल्या शरीराची अधिकच हानी होणार हे निश्चित आहे. बरेच दिवस बंद असलेली सायकल वापरात काढायची असेल तर आधी तिच्यावरची धूळ झटकावी लागेल. तिच्यावर चढलेला गंज काढावा लागेल. कदाचित तिचीचाके बदलून घ्यावी लागतील. चेनमध्ये नवीन वंगण घालावे लागेल. आणि हे सगळे झाल्यावर अगदी हळू वेगात ती फिरवून आणावी लागेल. अजून काही दुरुस्ती करायची असेल तर ती करून मग हळूहळू ती सायकल वापरात आणावी लागेल; पण अचानक वापरात काढली तर काय होऊ शकेल याची तुम्ही कल्पना करू शकता. मेडिटेटिव्ह फॉर्म वापरून आपण ही न वापरलेली सायकल वापरण्यायोग्य करणार आहोत. 

तुम्ही कधीच सूर्यनमस्कार घातले नसतील, तर पहिले किमान सहा महिने तरी फक्त मेडिटेटिव्ह फॉर्म करणे अपेक्षित आहे. (याचा व्हिडिओ लेखाच्या शेवटी दिला आहे.) एखाद्याला सहाऐवजी १२ महिने लागत असतील तर ते अगदी सर्वस्वीचालण्यासारखे आहे. या काळात आपण आपल्या शरीराला आणि मनाला याची गोडी लावणार आहोत. हा व्यायामप्रकार आपल्या दिनचर्येचा अंगभूत भाग करणार आहोत. याला ‘चेंज मॅनेजमेंट’मध्ये ‘इम्प्लिमेंटेशन’ (अंमलबजावणी) असे म्हणतात. हे इम्प्लिमेंटेशन आपण मेडिटेटिव्ह फॉर्ममध्ये करणार आहोत. त्याच्या नंतर एरोबिक फॉर्ममधून ते कायम ठेवणार आहोत. 

एरोबिक फॉर्मचा मुख्य उद्देश हा आपल्या हृदयाला व्यायाम करून देण्याचा आहे. आपले हृदय एका ठराविक दराने (Rate) कार्य करत असते. आपण विश्रांती घेतो तेव्हा त्याचा एक रेट असतो. त्याला रेस्टिंग हार्ट रेट म्हणतात (Hrest). आपण जेव्हा एखादी एरोबिक अॅक्टिव्हिटी करतो, तेव्हा हा हार्ट रेट वाढत जातो. तो किती वाढला पाहिजे याचे एक सूत्र आहे. समजायला थोडेसे अवघड असले, तरी येथे क्लिक करून तुम्ही ते मिळवू शकता. ते सूत्र वापरून तुम्ही तुमच्या वयाप्रमाणे तुमचा टार्गेट हार्ट रेट (Htarget) काढू शकाल. 



एक उदाहरण बघू. म्हणजे तुम्हाला ते समजायला मदत होऊ शकेल. 

तुमचे वय ४० वर्षे आहे आणि तुमचा रेस्टिंग हार्ट रेट ६० BPM आहे असे समजू. 

आता एरोबिक व्यायाम करून तुम्हाला तुमचा हार्ट रेट किती न्यायचा आहे ते पाहू. 

१. २२०मधून तुमचे वय वर्षे वजा करा. म्हणजे झाले २२० – ४० = १८० 

२. म्हणजे तुमचे Hmax झाला १८० bits per minute (BPM)

३. याचा अर्थ तुम्ही कुठल्याही परिस्थितीच तुमचा हार्ट रेट Hmaxपेक्षा कधीही जास्त न्यायचा नाही. Hmax पेक्षा जास्त हार्ट रेट नेलात, तर हृदय कायमचे डॅमेज होणार आहे. 

४. आता तुमचा टार्गेट हार्ट रेट काढू या. (Htarget)

५. तुम्ही अतिशय तंदुरुस्त असाल आणि तुम्हाला खूप rigorous exercise ची सवय असेल तर तुम्ही तुमचा हार्ट रेट जास्तीत जास्त Hmax च्या ७० ते ८५ टक्के (म्हणजे १८०च्या ७० ते ८५ टक्के) नेऊ शकता. म्हणजे १२६ ते १५३ BPM हा तुमचा टार्गेट हार्ट रेट झोन (Htargetmin१२६ ते Htargetmax १५३) झाला. कुठल्याही परिस्थितीत याच्या पुढे जाऊ नका. ही इंटेन्सिटी फक्त अतिशय सुदृढ, संपूर्ण निर्व्यसनी आणि सीझन्ड प्लॅक्टिशनर्स साठी आहे. थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचे तर it is a military fitness level. त्यामुळे तुम्ही नुकतीच सुरुवात केली असेल, तुम्हाला काही व्यसन असेल, काही आजार असेल तर ही तुमची रेंज नाही हे पक्के लक्षात ठेवा. 

६. तुम्ही मॉडरेट एक्सरसाइज  करत असाल तर तुमचा हार्ट रेट Hmaxच्या ५० ते ७० टक्क्यांपर्यंत नेऊ शकता. म्हणजे ९० ते १२३ BPM तुमचा टार्गेट हार्ट रेट झोन (Htargetmin ९० ते Htargetmax १२३) झाला. हेदेखील खूप अवघड आहे. ६० bpm चे १२० bpm करणे हेदेखील अवघड आणि दमवणारे आहे. तेव्हा योग्य ती काळजी घ्या. दमाल तिथे थांबा. 

७. तुम्ही नवीन सुरुवात करत असाल किंवा तुम्हाला व्यसन असेल, इतर काही त्रास असतील तर तुमच्या रेस्टिंग हार्ट रेटच्या ५-१० टक्क्यांपेक्षा जास्त हार्ट रेट नेऊ नका. तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने हळूहळू सुरुवात करा आणि हळूहळू इंटेन्सिटी वाढवत न्या.

८. हार्ट रेट मोजण्यासाठी एखादे उत्तम घड्याळ किंवा वेअरेबल हार्ट रेट डिव्हाइस घ्या. हे फार आवश्यक आहे.

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कसलीही घाई करू नका. तुमच्या हृदयाने जन्मापासून तुम्हाला फक्त मदत केलेली आहे. आता तुम्ही त्याला मदत करायची आहे.

So please be gentle with your loving heart. You got only one. 

Reptilian brain – The womb of paper tigers :

भवाच्या भये काय भितोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी ~ समर्थ रामदास 

तुम्ही हवेत उडू शकता का? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे? माणसे कधी उडू शकतात का?  तुम्ही असे विचारायचे कारण म्हणजे ‘माणसे कधीच उडू शकत नाहीत’ ही तुमची पक्की धारणा आहे. ही धारणा हा तुमच्या मनातला कागदी वाघ आहे (पेपर टायगर). तो वाघ सदैव तुम्हाला सांगतोय, की तुम्ही कधीही उडू शकणार नाही. 

या तुमच्या धारणेमुळे तुम्हाला विमानातून हवेत उंच नेले आणि हवेत उडी मारायला सांगितली, तर तुम्ही ती मारायला कधीही तयार होणार नाही. ‘माणूस उडू शकत नाही’ हा तुमचा, सततच्या स्व-संवादातून (self talk) अतिशय शक्तिशाली झालेला कागदी वाघ, तुम्हाला विमानातून उडी मारायची कधीही अनुमती देणार नाही. 

... पण त्याच विमानातून तुमच्यासमोर चार-पाच लोकांनी हवेत बिनधास्त उडी मारली आणि ते लोक सरळ खाली जमिनीवर न जाता एखाद्या मोठ्या पक्ष्यासारखे विमानाच्या आजूबाजूला हवेत तरंगू लागले, तर तुम्ही अतिशय आश्चर्यचकित व्हाल. ‘माणूस उडू शकतो’ हे तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष पाहाल, अनुभवाल, त्या वेळेला तुमच्या मनातला ‘माणूस उडू शकत नाही’ या धारणेचा कागदी वाघ शेवटची घटका मोजू लागलेला असेल. मग माणूस कसा आणि का उडू शकेल? या प्रश्नाचे कुतूहल तुमच्या मनात जागे होईल. आणि मग तुमचे मन हवेत उडण्याच्या प्रक्रियेची अजून माहिती जमवू लागेल. 



इतक्या प्रचंड उंचीवर आल्यावर, आपल्या खाली असलेला हवेचा समुद्र आपल्याला वरच्या वर उचलून धरायला अगदी सक्षम आहे. इतक्या उंचीवर हवेवर झोपणे, हे अथांग समुद्राच्या पाण्यावर पोहण्यासारखेच आहे, अशासारखे तर्कसंगत विचार तुमच्या मनात येऊ लागतील. आणि इथे तुमचा ‘माणूस उडू शकत नाही’ हा कागदी वाघ अगदी निपचित होऊन पडलेला असेल. मग तुम्हीदेखील अतिशय त्वरेने एखाद्या निष्णात सैनिकासारखे विमानातून हवेत झेपावाल. आमच्या इथे iFly नावाचे एक ठिकाण आहे. तिथे तुम्हाला हवेत उडता येण्याचा सराव करता येतो. आणि आश्चर्य म्हणजे माझ्या आईनेसुद्धा हवेत उडण्याचा अनुभव घेतलेला आहे. 

सांगायचा मुद्दा असा, की आपल्या मनातली प्रत्येक धारणा हा आपण जाणूनबुजून पाळलेला एकेक कागदी वाघच आहे. याच्यामध्ये ‘मी कधीच विमान विकत घेऊ शकत नाही’, ‘मी कधीच वर्गात पहिला येऊ शकत नाही’ किंवा ‘मी कधीच पंतप्रधान होणार नाही’ हे आणि असे अनेक कागदी वाघ आहेत. हे कागदी वाघ आपल्या अंगभूत भीतीमधून आलेले आहेत. आपण ‘प्राण चक्र विचार’ या लेखात पाहिले, की आपल्यात एक निगेटिव्ह नाडी आहे आणि एक पॉझिटिव्ह नाडी आहे. असे असले तरी आपल्या रेप्टिलियन ब्रेनचा (सापाचा मेंदू) बायस निगेटिव्ह आहे. रेप्टिलियन ब्रेनमध्ये फक्त दोनच गोष्टी घडू शकतात एक म्हणजे फाइट आणि दुसरी म्हणजे फ्लाइट. म्हणजे ‘समोरचा हा आपला शत्रू आहे’ आणि ‘त्याच्यापासून आपल्याला धोका आहे’ ही रेप्टिलियन ब्रेनची मुख्य धारणा आहे. मग या धारणेतून तो मेंदू आपल्याला दोनच आज्ञा देऊ शकतो. एक म्हणजे त्या समोरच्याशी भांड, त्याला चाव, त्याला भीती दाखव, पळवून लाव किंवा नामोहरम कर (fight). नाही तर समोरचा आपल्यापेक्षा जास्त शक्तिमान वाटत असेल, तर इथून तत्काळ पळ काढ (flight). 



नाग, साप, मगर यांच्या डोक्यात फक्त रेप्टिलियन ब्रेनच आहे. गाय, कुत्रे, मांजर अशा सस्तन प्राण्यांचा मेंदू बराच प्रगल्भ आहे. त्यांना लिम्बिक सिस्टिम मिळालेली आहे. मॅमालियन ब्रेन मिळालेला आहे. इथे भावना आहे. त्यामुळे हे प्राणी भावनिक होऊन विचार करू शकतात. ते माणसासारखे बोलू शकत नसले, तरी त्यांच्या प्रतिक्रिया या साप किंवा मगरीच्या प्रतिक्रियेपेक्षा खूप वेगळ्या असतात. हे प्राणी माणसावर प्रेम करू शकतात. मालक आजारी असेल किंवा तो दगावला तर त्या घरातली गाय रात्र रात्र रडते किंवा मालक गेल्यावर कुत्रा जेवण सोडून देतो, अशा सारख्या प्रतिक्रिया त्यांच्या मॅमालियन ब्रेनमधून आलेल्या आहेत. 

माणसाच्या मेंदूच्या उत्क्रांतीमध्ये या मॅमालियन ब्रेनच्या वर अजून एक थर त्याला मिळालेला आहे. त्याला निओ कॉर्टेक्स असे म्हणतात. या निओ कॉर्टेक्सचा उपयोग करून माणूस त्याच्या भावना, विचार व्यक्त करू शकतो. लेखन, कविता, वक्तृत्व, नाट्य, संगीत अशी माणसाच्या अभिव्यक्तीची माध्यमे ही माणसाला त्याच्या निओ कॉर्टेक्समुळे मिळालेली आहेत. आता हा झाला आपल्या, सापाच्या आणि गाईच्या मेंदूतला फरक. 

सगळ्याच माणसांना निओ कॉर्टेक्स मिळालेला असला, तरी मग वेगवेगळी माणसे वेगवेगळ्या प्रकाराने व्यक्त का होत असतात? काही उत्तम बोलू शकतात. काही उत्तम लिहू शकतात. काही उत्तम गाऊ शकतात, तर काही अतिशय मुखदुर्बल असतात. काही अजिबात गाऊ शकत नाहीत. काही जणांना नाट्य जमत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे निओ कॉर्टेक्स किती आणि कसे विकसित झाले आहे याच्यावर ते अवलंबून असते. ज्यांचा निओ कॉर्टेक्स अधिक विकसित झालेला असतो, त्यांच्या प्रतिक्रिया या अधिक समग्र आणि समतोल असतात. ज्यांचा तो विकसित झालेला नसतो किंवा त्यात काही त्रुटी राहिलेल्याअसतात त्यांच्या प्रतिक्रिया या विक्षिप्त आणि एककल्ली असतात. त्यांच्या प्रतिक्रिया या बऱ्याच वेळेला रेप्टिलियन ब्रेनमधूनच येतात. त्यांना मॅमालियन ब्रेनमध्ये भावनांची फोडणी मिळते आणि मग ती माणसे अत्यंत अनप्लीझंट अशा प्रतिक्रिया देतात. या लोकांचा फीअर फॅक्टर खूप जास्त असतो. त्यांना सगळ्याची भीती वाटते. आणि त्या भीतीतून ते fight or flight अशा अवस्थेमध्ये आयुष्यातला बराच काळ व्यतीत करतात. या माणसांच्या ‘एखादी गोष्ट होणारच नाही’ याबद्दलच्या ‘धारणा’ (कागदी वाघ) खूप जास्त असतात. आणि हेच कागदी वाघ त्यांना अनेक चांगले चांगले अनुभव घेण्यापासून आयुष्यभर परावृत्त करत राहतात. 

याच्यावर अधिक माहिती हवी असेल तर Joseph Chilton Pearce यांनी लिहिलेली ३ पुस्तकांची मालिका अगदी अवश्य वाचा. हृदय, मेंदू, त्यातून विकसित होत जाणार निओ कॉर्टेक्स आणि एकूणच आपण असाच विचार का करतो (psychology of belief) याची अतिशय समग्र उत्तरे या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील. 

आता लक्षात एवढेच घेऊ या, की आपला रेप्टिलियन ब्रेन आपल्याला सतत कशाची तरी भीती दाखवत बसलेला असतो. त्या भीतीतून आपल्या मनात अनेकानेक धारणा तयार होऊन बसतात. मग त्या धारणा आपल्याला अजून भीती दाखवत बसतात. हे एक दुष्टचक्र आहे. आपल्याला त्यातून बाहेर पडायचे आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येक कृतीवरचा रेप्टिलियन ब्रेनचा प्रभाव कमीत कमी कसा करता येईल ते पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी सूर्यनमस्कार आपल्याला कसे मदत करू शकतात ते पाहू या. 



Take the number out of the equation :

‘१०८ सूर्यनमस्कार घालणे’ किंवा ‘मला १०८ सूर्यनमस्कार घालता येणारच नाहीत’ हीदेखील आपल्या बऱ्याच जणांच्या मनात असलेली एक धारणा आहे; पण तोदेखील एक कागदी वाघ आहे हे आधी लक्षात घेतले पाहिजे. हे अगदी सहज शक्य आहे. तुम्ही थोडी श्वासाची सवय केलीत तर कुणीही अर्ध्या तासात अगदी सहज १०८ सूर्यनमस्कार घालू शकतो. १०८च काय, तुम्ही अगणित सूर्यनमस्कार घालू शकता. याच्यासाठी पहिली गरज आहे तो म्हणजे आपल्या मनातला १०८ या आकड्याविषयीचा कागदी वाघ संपविण्याची. 

आपल्या मेंदूचे दोन भाग आहेत. एक आहे उजवा मेंदू आणि दुसरा आहे डावा मेंदू. उजवा मेंदू हा कलात्मक आहे. त्याला कल्पनाविस्तार आवडतात. त्याला इमॅजिनेशन आवडते. तो स्वप्नाळू आहे. एखादी गोष्ट थांबवणे हे त्याचे कामच नाही. चालू असलेल्या प्रत्येक गोष्टीला अधिक साह्य कसे करता येईल याच्यावर उजव्या मेंदूचा भर आहे. हे म्हणजे थोडेसे आपल्या शाळेतले चित्रकलेच्या बाईंसारखे काम आहे. अतिशय लाघवीपणाने मुलांचे कौतुक करावे, त्यांनी जे काही काढले आहे त्याची वाहवा करावी, त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांना अजून चांगले काम करण्यासाठी तयार करावे. आपल्या कल्पनाविस्ताराची सगळी भिस्त आपल्या निओ कॉर्टेक्सवर आहे. त्यामुळे प्रत्येक कल्पना विस्तारामुळे आपला निओ कॉर्टेक्स अधिक उद्दिपीत होणार आहे. बाईंच्या कौतुकाचे (appreciation) प्रोत्साहन आपल्याला मिळत राहणार आहे. 



याच्या बरोबर उलट आपला डावा मेंदू आहे. त्याला आकडे आवडतात. संख्या आवडतात. गणिते करायला आवडते. आणि तो सदैव आपल्याला धोक्याच्या सूचना देत बसलेला असतो. या मेंदूचे गणित अतिशय पक्के आहे. समोरून येणारी गाडी, तिचा वेग, आपला वेग, आणि आपण किती सेकंदात ओव्हरटेक करू शकतो, अशासारखी भन्नाट गणिते तो लीलया सोडवू शकतो. एखाद्या वळणावर आपली गाडी पलटी होऊ शकते का नाही, याचे गणित तो काही नॅनोसेकंदात करू शकतो. वेग जास्त वाटला तर आपल्या पायांना वेग कमी करण्याची आज्ञा सोडतो. वेग योग्य वाटला तर ते वळण एंजॉय करायची आज्ञा आपल्या सेन्सरी सिस्टीम ला देतो. 
हे म्हणजे थोडेसे हातात कायम वेताची छडी घेतलेल्या खाष्ट अशा गणिताच्या मास्तरांसारखे काम आहे. गणित बरोबर आले तर फारसे कौतुक, शाबासकी वगैरे काहीही मिळत नाही; पण ते गणित चुकले तर हे मास्तर वर्गात अंगठे धरून उभे करायला मागे पुढे पहात नाहीत. आपल्या रेप्टिलियन ब्रेनची भिस्त या सगळ्या कॅल्क्युलेशन्सवर आहे. आणि प्रत्येक कॅल्क्युलेशनमुळे आपला रेप्टिलियन ब्रेन उद्दिपीत होतो आहे. मास्तरांच्या छडीची भीती कायम आपल्याला वाटत राहणार आहे. 

आता तुमच्या लक्षात आले असेल, की आपल्या क्षमता आपल्याला तपासून बघायच्या असतील, वाढवायच्या (excel and exceed) असतील, काल जे केले त्याच्यापेक्षा आज अजून उत्तम, देखणे काम करायचे असेल, तर गणिताच्या मास्तरांपेक्षा चित्रकलेच्या बाई आपल्याला जास्त मदत करू शकणार आहेत. 

A good coach can change your game. But a great coach can change your life. ~ John Wooden

म्हणून १०८ (किंवा त्याहून जास्त) सूर्यनमस्कार घालत असताना आपणदेखील आपल्या उजव्या मेंदूची (Great coach) मदत घेणार आहोत. त्यासाठी सूर्यनमस्कार मोजत असताना त्यातून नंबर आणि त्यायोगे आपल्या डावा मेंदूचा (Good coach) प्रभाव कमी कमी करत नेणार आहोत. 



तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्ही समजा २४ सूर्यनमस्कार घालत असाल, आणि १, २, ३, असे मोजत असाल, तर १६ किंवा १७व्या सूर्यनमस्काराला तुमचा मेंदू तुम्हाला सांगू लागेल, की ‘अरे बापरे १६ सूर्यनमस्कार झाले रे’, ‘बास आता’, ‘एवढे कशाला घालायचे सूर्यनमस्कार?’, ‘मरायचे आहे का?’ किंवा ‘आता फक्त ८ राहिले बरं का’, ‘मग ७ राहिले रे’ आणि मग शेवटचे दोन सूर्यनमस्कार, खांद्यावरून पृथ्वी उचलून नेत असल्यासारखे जड जातात... इथे गणिताचे मास्तर निष्कारण ताप देत बसलेले आहेत, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. 

आता चित्रकलेच्या बाई २४ नमस्कार घालताना कशी मदत करतात ते बघा. एक सूर्यनमस्कार घालून झाला, की सूर्याचे एक नाव घ्या. ‘ॐऱ्हांमित्राय नम:.’ मग त्या नावाचा अर्थ शोधा. मग तुमचे मन तुम्हाला सांगू लागेल, की ‘अरे वा! सूर्य माझा मित्र आहे’, ‘तो मला मदत करणार आहे.’ मग पुढच्या नमस्कारानंतर म्हणा ‘ॐ ऱ्हिं रवये नम:’ मग मन त्या नावाचा अर्थ शोधू लागेल. त्या अर्थातून तुमच्या मनातल्या सूर्याविषयीच्या अतिशय उच्च भावना जागृत होत जातील. हे कसे होते ते आपण सूर्यस्तुती या भागात पाहिलेच आहे. सूर्याची अशी १२ नावे आहेत. एका नमस्कारानंतर एकेक नाव घ्यायचे आहे. त्याच्या अर्थात रममाण व्हायचे आहे. समोर असलेल्या सूर्याला नमस्कार घालण्याची शक्ती आणि बुद्धी दिल्याबद्दल धन्यवाद द्यायचे आहेत. क्षणिक उसंत घेउन पुढच्या नावासाठी नव्या सूर्यनमस्काराची सुरुवात करायची आहे. 



पहिले १२ सूर्यनमस्कार उजवा पाय आधी वापरूनकरायचे आहेत. मग पुढचे १२ नमस्कार डावा पाय आधी वापरून करायचे आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण तुम्हाला काही कळायच्या आधीच तुमचे २४ सूर्यनमस्कार झालेले असतील. इथे नंबरच नसल्याने, किती राहिले, किती झाले, आपण किती करू शकतो, तो किती करू शकतो, मी का नाही करू शकत? याचा कसलाही हिशेब नाही. या २४ नमस्कारांनंतर तुम्हाला एक जबरदस्त आत्मविश्वास मिळणार आहे. २४ नमस्कारांचा एक सेट काढून झाल्यावर तुमचे मन सूर्याच्या विचाराने अजूनच उजळून निघणार आहे. शरीरात भरपूर नवीन डोपामाइन आणि नवीन सेरोटोनिन तयार झाल्याने तुमचे मन अजूनच आनंदी झालेले असणार आहे आणि ते तुमच्या शरीराला पुढचा २४ नमस्कारांचा सेट करण्याचा आग्रह करणार आहे. 

इथे कसलेही कम्पल्शन नाही. मनाची शरीरावर, शरीराची मनावर कसलीही सक्ती नाही. मन आनंदी आहे. शरीर त्याहून आनंदी आहे. आणि ते दोघे एकमेकांना अजून आनंदी होण्याचा आग्रह करणार आहेत. 

सर्व पुरुषार्थ देण्यास समर्थ असलेल्या सूर्याला, एकेका पुरुषार्थासाठी (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) एक २४ नमस्कारांचा सेट केलात, तर तुम्हाला काही कळायच्या आधीच तुमचे ९६ (२४ * ४ = ९६) नमस्कार झालेले असणार आहेत. त्याच्यानंतर १२ सूर्यनमस्कार मेडिटेटिव्ह फॉर्ममध्ये करून संपूर्ण सूर्यभेटीचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. त्यायोगे तुमचे १०८ सूर्यनमस्कार संपूर्ण होणार आहेत. आपल्या शरीरात १०८ चक्रे आहेत. त्यामुळे त्यातल्या प्रत्येक चक्रासाठी एकेक सूर्यनमस्कार, म्हणून १०८ नमस्कार असे म्हटले तरी ते चालण्यासारखे आहे. सूर्य पृथ्वीपासून पृथ्वीच्या व्यासाच्या १०८ पट दूर आहे. त्या प्रत्येक व्यासासाठी एकेक नमस्कार करत आपण सूर्याच्या अगदी समीप जाऊन पोहोचणार आहोत अशी कल्पना केली, तरी चालण्यासारखे आहे. 

अशा पद्धतीने घातलेले १०८ सूर्यनमस्कार हा प्रेमासारखाच एक अतींद्रिय असा अनुभव आहे. तो शब्दांत सांगणे अवघड आहे. तो शब्दांत सांगूही नये. शब्दांत ऐकूही नये. हे पिता-पुत्राचे प्रेमच आहे.

प्रेम न ये दावता, न सांगता, न बोलता, 
अनुभव चित्ता, चित्त जाणे ।।

संगीताच्या संगतीने हा पितृप्रेमाचा अनुभव आपण शतगुणित करणार आहोत. त्याविषयी पुढच्या रविवारी पाहू. 

शुभं भवतु ।। 

- निखिल कुलकर्णी
ई-मेल : nskulkarni@gmail.com

(सूर्यनमस्कार उपक्रमाला फॉलो करण्यासाठी - व्हॉट्सअॅप)

(या लेखमालेतले आधीचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VUCMCW
Similar Posts
संगीत विचार (सूर्यनमस्कार लेखमाला - १२) मागच्या रविवारी आपण सूर्यनमस्कारांचा एरोबिक फॉर्म पाहिला. याच्यात आपण शरीर, मन, आत्मा आणि श्वास यांचे संचलन कसे करायचे ते पाहिले. आजच्या, लेखमालेच्या शेवटच्या भागात आपण शरीर, मन आणि आत्म्याच्या या संचलनात संगीताचा कसा वापर करून घेता येईल ते पाहू.
आत्मन् (सूर्यनमस्कार लेखमाला - ४) मागच्या आठवड्यात आपण सूर्यनमस्कारातून आपल्या शरीराला आणि त्यायोगे आपल्याला आपला धर्म कसा साधता येईल, याचा विचार केला. त्यामुळे आता आपल्याला मिळालेल्या तीनपैकी मन आणि शरीर या दोन endowmentचे संगोपन सुनिश्चित झाले. आता आज आपण सूर्यनमस्काराचे आपल्या आत्मिक उन्नतीवर होणारे परिणाम पाहणार आहोत.
प्राणचक्र विचार (सूर्यनमस्कार लेखमाला - ९) मागच्या आठवड्यात आपण सूर्यनमस्कार घालत असताना घ्यायची सूर्याची नावे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या कृतज्ञता (Gratitude) आणि कौतुक (Apreciation) या बाबींचा विचार केला. त्यातून आपल्या शरीरावर आणि मनावर कसे चांगले परिणाम होतात तेदेखील पाहिले. आज आपण आपल्या शरीरात असलेली प्राणचक्रे, त्यांच्या जागा, त्यांचे
मेडिटेटिव्ह फॉर्म (सूर्यनमस्कार लेखमाला - १०) सकाळी उठून सूर्याला नमस्कार करणे हा असाच एक बदल आहे आणि आपल्याला तो आपल्या आयुष्याचा भाग करायचा आहे. सूर्य रोज उगवतो, मग त्याला नमस्कारदेखील रोज करायचा आहे, अशा मानसिकतेत कायमचे मुक्कामाला जाणे हा खूप मोठा बदल आहे. एका दिवशी १००० सूर्यनमस्कार घालायचे आणि नंतर ६ महिने सूर्याकडे फिरकायचेदेखील नाही. असे आपल्याला अपेक्षित नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language